गुटख्यावर धडक कारवाई, मग दारूबाबत मौन का?
(तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेनंतर राज्यात नवी चर्चा; व्यसनमुक्तीच्या लढ्यात दुहेरी निकषांचा सवाल)
संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई, मोठ्या प्रमाणावर धाडी आणि मकोकासारख्या कठोर कायद्यांचा इशारा यामुळे अनेक व्यापारी आणि विक्रेते धास्तावले आहेत. मात्र या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता राज्यभरात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे – "गुटखा चुकीचा असेल तर दारूबाबत तितकीच कठोर भूमिका का घेतली जात नाही?"
राळेगाव तालुक्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने सांगत आहेत. तोंडाचा कर्करोग, दात व हिरड्यांचे आजार आणि इतर गंभीर समस्या यामुळे गुटखाबंदीचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र दुसरीकडे दारूच्या व्यसनामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. कौटुंबिक कलह, आर्थिक संकट, अपघात, गुन्हेगारी आणि विविध गंभीर आजारांमागे दारूचे व्यसन एक प्रमुख कारण असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक कुटुंबांची आर्थिक घडी दारूमुळे विस्कटल्याच्या घटना सातत्याने समोर येतात.राळेगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये खुलेआम दारू सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी दारूच्या नशेत होणारे वाद, मारहाण, महिलांवरील अत्याचार आणि रस्ते अपघात यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुटख्यावर कारवाई करणाऱ्या यंत्रणांनी दारू विक्री केंद्रांवर, अवैध मद्यविक्रीवर आणि कथित निकृष्ट दर्जाच्या मद्यावरही तितक्याच कठोरपणे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
राज्यातील अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीतून आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला होता. प्रशासनाच्या कठोर कारवाईनंतर अनेक दुकानदार आर्थिक अडचणीत आल्याची भावना व्यक्त करीत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य आणि जनहिताच्या दृष्टीने ही कारवाई योग्य असल्याचे मतही व्यक्त होत आहे. त्यामुळे या विषयावर समाजात दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून सुरू असलेल्या मोहिमेमुळे भेसळयुक्त अन्न, बनावट औषधे आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई होत आहे. ही मोहीम जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र सर्व प्रकारच्या व्यसनांबाबत समान निकष लागू केले जातील का, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सामाजिक संघटना, पालक वर्ग आणि काही नागरिकांनी राज्य शासनाने दारूच्या दुष्परिणामांवरही व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अवैध मद्यविक्रीवर कठोर कारवाई करावी आणि व्यसनमुक्ती केंद्रांना अधिक बळ द्यावे, अशी मागणी केली आहे. व्यसनमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर गुटखा, तंबाखू, अवैध मद्य आणि इतर घातक पदार्थांविरोधात एकसमान धोरण राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
आज घडीला राज्यात सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला प्रश्न म्हणजे — "गुटख्यावर कारवाई होते आहे, मग दारूबाबतही तितकीच कठोर मोहीम राबविली जाणार का?" याचे उत्तर येत्या काळात प्रशासन आणि शासनालाच द्यावे लागणार आहे हे मात्र विशेष
Post a Comment
0 Comments