*ज्येष्ठ शिक्षिका कु. शालू सदाफळे यांचा भावपूर्ण निरोप समारंभ संपन्न*
युवा संघर्ष न्यूज
कळंब शहर प्रतिनिधि :- नितेश शिरसागर
कळंब, दि. १ मे २०२६ : स्थानिक शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळा, कळंब येथील ज्येष्ठ शिक्षिका कु. शालू सखाराम सदाफळे या नियत वयोमानानुसार दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ शाळेत भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशक्ती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक प्रा. रविशंकर उर्फ बाळासाहेब धांदे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आशिष महाजन उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक आशिष महाजन यांनी आपल्या मनोगतात कु. शालू सदाफळे यांच्या तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळाचा गौरव करतांना , शाळेच्या जडणघडणीत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. त्यांच्या शैक्षणिक समर्पणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडले, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेचे व्यवस्थापक प्रा. बाळासाहेब धांदे यांनी शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासात कु. शालू सदाफळे यांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा आढावा घेत, त्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धती, निष्ठा आणि सेवाभावी वृत्तीबद्दल विशेष गौरवोद्गार काढले.
समारंभात उपस्थित शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी आपल्या भावना व्यक्त करत कु. शालू सदाफळे यांच्या कार्याला सलाम केला व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनोज शिवरकर, मयूर होले, शिवम चांदोरे, सौ. प्रांजली धरणे, कु. चंद्रभागा मेश्राम आणि विठ्ठल राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भावनिक आणि प्रेरणादायी समारंभातून कुमारी शालू सदाफळे यांच्या शैक्षणिक सेवेला कृतज्ञ अभिवादन करण्यात आले.
युवा संघर्ष न्यूज
मुख्य संपादक :- सुशील हटवार

Post a Comment
0 Comments