*यवतमाळ महोत्सवात बाभुळगावच्या 'ज्ञानदीप महिला प्रभाग संघा'चा डंका; ५.५० लाखांची विक्रमी विक्री आणि द्वितीय पुरस्काराने गौरव*
यवतमाळ
उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित 'समृद्धी मिनी सरस' प्रदर्शनीमध्ये बाभुळगाव तालुक्यातील ज्ञानदीप महिला प्रभागसंघ, सावर यांनी आपल्या दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. या महोत्सवात प्रभागसंघाने ५ लाख ५० हजार रुपयांची विक्रमी विक्री करून प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला.
यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्र (वाघापूर) येथे २७ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान 'यवतमाळ महोत्सव २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले होते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि 'उमेद' अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, समृद्धी सरस आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यवतमाळकरांना मिळाली.
*मान्यवरांच्या हस्ते गौरव*
प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. विकास मीना आणि उमेदचे प्रकल्प संचालक आनंद पिंगळे यांच्या हस्ते ज्ञानदीप महिला प्रभागसंघाचा सन्मान करण्यात आला. प्रभागसंघाच्या वतीने शारदाताई बुरडकर, जयाताई खोडे आणि प्रभाग समन्वयक अल्पा राठोड मॅडम यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वीकारले.
*विक्रमी विक्री आणि दर्जेदार उत्पादने*
ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले जाते. बाभूळगाव तालुक्यातील महिलांनी तयार केलेल्या विविध घरगुती व कृषी उत्पादनांना ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ५.५० लाखांची विक्री ही तालुक्यातील महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल मानले जात आहे.
*यशाचे मानकरी*
या यशात गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करणाऱ्या स्वातीताई शेंडे, जयाताई खोडे, कविताताई राऊत, अश्विनीताई हेटे, संगीताताई कैकाडे, ज्योतीताई चांदेकर, शारदाताई बुरडकर, रत्नमालाताई लाकडे, यमुनाताई जांभुरे आणि कमला झामकोल यांचा मोलाचा वाटा आहे.
मार्गदर्शकांचे प्रोत्साहन
या यशासाठी बाभूळगावच्या गट विकास अधिकारी श्रीमती उज्वला ढोरे, तालुका अभियान व्यवस्थापक अमित जाधव, तालुका व्यवस्थापक प्रशांत मोदी, सुनील जाधव, अनुप बोबडे, प्रभाग समन्वयक विजय उघडे, सागर चिक्कमवार, अमोल उबाळे आणि जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या टीमचे निरंतर मार्गदर्शन लाभले. तसेच प्रभागसंघ व्यवस्थापक चैतालीताई कपिले, दीपमालाताई भोयर व सुषमा गाढवे यांचे विशेष सहकार्य लाभले.
बाभूळगाव तालुक्यातील महिलांनी मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत असून, ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला यामुळे मोठी उभारी मिळाली आहे.
युवा संघर्ष न्यूज
मुख्य संपादक :-: सुशील हटवार 9359412352

Post a Comment
0 Comments