कळंब येथील महसूल शिबिरात अडीच हजार प्रमाणपत्रांचे वाटप; नागरिकांना मिळाला मोठा दिलासा
कळंब (यवतमाळ):
तालुक्यातील पिंपळगाव (रुईकर) येथील थाटेश्वर मंदिर देवस्थान परिसरात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा'चे अत्यंत यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महसूल विभागातर्फे विविध प्रकारच्या तब्बल २५०० (अडीच हजार) प्रमाणपत्रांचे वाटप करून नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला तहसीलदार धीरज स्थूल, गटविकास अधिकारी भूपेंद्र बाहेकर, तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे, भूमीलेख अधीक्षक नान्ने, नायब तहसीलदार अभय देशपांडे आणि मुख्यमंत्री फेलो कुलकर्णी यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिबिरादरम्यान वर्ग-२ च्या जमीन नोंदी अद्ययावत करणे, सातबारा उताऱ्यांचे वितरण, डिजिटल सातबारा व ८-अ उतारे उपलब्ध करून देणे, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रीमीलेअर यांसारखी आवश्यक कागदपत्रे नागरिकांना त्वरित प्रदान करण्यात आली.
यासोबतच पंचायत विभाग, शिक्षण, कृषी, आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी, पशुवैद्यकीय विभाग, पुरवठा विभाग आणि सेतू व सुविधा केंद्र यांनी आपले स्टॉल्स लावून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा पुरवल्या. निवडणूक विभाग आणि अभिलेखागार विभागानेही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.
महसूल शिबिरात अडीच हजार प्रमाणपत्रांचे वाटप; नागरिकांना मिळाला मोठा दिलासा
अधिकारी सचिन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी दिनेश बेले, मोहन चंदने, संदीप नाईकवाडे, दीपाली वटे, कल्याणी कुरसंगे आणि महसूल कर्मचाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे परिसरातील ग्रामीण नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला असून, प्रशासकीय कामात सुसूत्रता आल्याची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments